नवी दिल्ली : मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने येत्या 48 तासांत तो दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिण पूर्व भागात दाखल होणार आहे.
विषुववृतीय भागाकडून बंगालच्या उपसागर आणि अंदमानच्या समुद्राकडे जोरदार उष्ण प्रवाह वाहत आहेत. त्यामुळेच मान्सून प्रवास सरासरीच्या वेळेआधी तीन ते चार दिवस झाला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र व निकोबार बेटांवर मान्सून 20 ते 22 मेच्या आसपास येत असतो. मात्र, अनुकूल स्थितीमुळे मान्सूनचा प्रवास सुकर झाला आहे. अशीच स्थिती पुढील काही दिवस राहिली, तर केरळच्या किनारपट्टीवरदेखील वेळेच्या आधी मान्सून दाखल होण्याची चिन्हे आहेत.
मान्सूनचे आगमन या भागात 48 तासांत होणार असल्यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढील पाच दिवस जोरदार वारे, विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. याबरोबरच ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, हिमालयीन भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मिझोराम, त्रिपुरा या भागांत अतिमुसळधार पाऊस पडणार आहे.