राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात तरुणांना जास्त संधी :मेहबूब शेख

0
पिंपरी : लोकनेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे चौपन्न आमदार निवडून आले. या आमदारांपैकी सव्वीस आमदार पहिल्यांदा निवडून आले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सर्वात तरुण आमदारांची संख्या असणारा पक्ष आहे. आगामी मनपा निवडणूकीतही तरुणांना जास्त संधी मिळावी अशी मागणी आपण वरिष्ठांकडे करणार आहोत. असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले.
शुक्रवारी (दि. 30 जुलै) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेख बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर, संदिप चिंचवडे, विजय आवटे, युवा नेते विराज लांडे पाटील, युवक कार्याध्यक्ष शाम जगताप, योगेश गवळी, चिंचवड विधानसभा अध्यक्ष कुणाल थोपटे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शेखर काटे, भोसरी विधानसभा अध्यक्ष अमित लांडगे, माधव पाटील, युवक प्रवक्ते भागवत जवळकर, युवक उपाध्यक्ष प्रसाद कोलते, युवक सरचिटणीस अक्षय माछरे आदी उपस्थित होते.
मेहबूब शेख पुढे म्हणाले की, महानगरपालिका निवडणूका स्वतंत्र की महाविकास आघाडी समवेत एकत्रित लढायच्या याचा निर्णय शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे आदी वरिष्ठ नेते घेतील. परंतू तरुणांना जास्त संधी मिळावी यासाठी स्वतंत्र लढणे अपेक्षित आहे.
स्थानिक पातळीपासून दिल्लीपर्यंत सामान्य नागरिकांच्या खिशावर आधुनिक दरोडा टाकण्याचे धोरण भारतीय जनता पार्टीचे आहे. रोजच होणारी इंधन दरवाढ आणि आता पिंपरी चिंचवड मध्ये वाहनांसाठी पे ॲण्ड पार्क योजना ही भाजपची दादागिरी आहे. पे ॲण्ड पार्क योजनेला आता नागरिकांनीच असहकार आंदोलन करुन उत्तर द्यावे. कोणीही नागरिकांनी यापुढे पे ॲण्ड पार्कचे पैसे देऊ नये. यासाठी लवकरच शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस हेल्पलाईन नंबर जाहिर करणार आहे. पंतप्रधानांच्या स्मार्ट सिटी योजनेतून पिंपरी चिंचवड शहराला काय मिळाले याचे भाजपाने उत्तर द्यावे.
शंभर शहरे स्मार्ट करणार हे आश्वासन देखिल पंधरा लाखांच्या आश्वासनाप्रमाणे निवडणूक जूमला आहे का ? राष्ट्रवादीच्या काळात अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली शहर स्वच्छतेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. त्यावेळी देशभरातील शिष्ठमंडळे आणि प्रतिनिधी या शहरातील स्वच्छता आणि नियोजन पाहण्यासाठी येत होते. आता भाजपाच्या शिष्ठमंडळाला इंदोरला जावे लागते. पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाच्या चुकीच्या कामाला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने वेळोवेळी रस्त्यांवर उतरुन पन्नांसहून जास्त वेळा तीव्र आंदोलने केली आहेत. यापुढे आणखी तीव्र स्वरुपात विरोध करुन जनजागृती केली जाईल असेही राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, घरटी एकोणीस रुपये कचरा संकलन करास राष्ट्रवादीचा तीव्र विरोध आहे. इंदोर मनपा मधिल जे चांगले असेल ते येथे राबवावे, परंतू त्यासाठी नागरिकांकडून पैसे घेण्यास आमचा विरोध आहे. पुणावळे येथिल कचरा डेपोची जागा मागिल साडेचार वर्षात ताब्यात घेतली नाही. हे शहरातील सत्ताधारी भाजपाचे अपयश आहे अशी टिका संजोग वाघेरे पाटील यांनी केली.
Leave A Reply

Your email address will not be published.