पुण्यातील 250 हून अधिक लोकांची नासा, इस्रोच्या नावाखाली 5 ते 6 कोटींची फसवणूक

0

पुणे : नासा, इस्रो, यासारख्या संशोधन संस्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या धातूच्या व्यवसायात गुंतवणूक करून मोठा लाभ मिळवण्याचे आमिष दाखवून या टोळीने पुण्यातील 250 हून अधिक लोकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

नासा, इस्रोसारख्या अनेक संस्था उपग्रहांमध्ये वापरत असलेल्या धातूच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास फार मोठ्या पटीने फायदा होऊ शकतो, असे सांगून 4 जणांच्या टोळीने पुण्यातील अनेकांना गंडा घातला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या आरोपींनी गुंतवणूकदारांसाठी एक बैठक बोलावली होती.

त्यात एका मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन देखील केले. अमेरिकेच्या संशोधन संस्था ‘नासा’ मधील लोकं भारतात येणार आहेत. यावेळी शास्त्रज्ञ ‘राइस पूलर’ या यंत्रावर संशोधन होणार आहे. तसेच संपूर्ण जगात राइस पूलर या धातूच्या भांड्याला मागणी असल्यामुळे आरोपींनी गुंतवणूकदारांना 1 लाख गुंतवले तर 1 कोटी मिळतील अशी बतावणी केली होती. इतकंच काय तर या आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून नागरिकांकडून पैसे जमा केले.

पुण्यातील 250 हून अधिक लोकांची जवळपास 6 कोटी रुपयाची फसवणूक झाली असल्याची माहिती, पोलिस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) श्रीनिवास घाडगे यांनी दिली

या प्रकरणी राम गायकवाड, रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ, राहुल जाधव यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात या सगळ्यांविरोधात भारतीय दंडात्मक कलम 406, 420, 467, 468, 471, 120 (ब) व 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हित रक्षण अधिनियम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉपर इरेडियम हा एक प्रचीन धातू आहे. या मौल्यवान धातूची क्षमता शोधण्यासाठी राइस पुलिंग या चाचणीचा वापर केला जातो. या प्रक्रियेत तांदूळ एका बाजूला ठेवून समोर कॉपर इरेडियम धातूची वस्तू ठेवली जाते. ही वस्तू तो तांदूळ किती अंतरावरून खेचून घेते, यावर या वस्तूची किंमत ठरते. जितक्या जास्त लांबीवरून तांदूळ खेचला जाईल, तितकी जास्त किंमत मिळते. यालाच राइस पुलिंग म्हणतात.

Leave A Reply

Your email address will not be published.