मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असणाऱ्या शाळेचे पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग बुधवारपासून (27 जानेवारी) सुरु करण्यात आले आहेत. तर पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा विचार सरकार करत असल्याचे मत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलंय
वर्षा गायकवाड म्हणाल्या, “विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच प्राथमिकता ठेऊन आम्ही तिसऱ्या टप्प्यातील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करत आहोत. शिक्षकांच्या आरटीपीसीआर तपासण्या झाल्या आहेत. पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना मास्क बांधूनच पाठवावे. विद्यार्थ्यांनी स्वतःची पुस्तके स्वतःच हाताळावी. पूर्ण काळजी घेऊन हे वर्ग सुरु करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. हा टप्पा यशस्वी झाल्यानंतर चौथीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा आम्ही विचार करू.”
दरम्यान, 27 जानेवारीपासून राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. शाळा सुरु करताना विद्यार्थी आणि शिक्षक यांनी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी दिल्या होत्या.