मुंबई : सातत्याने भाजप व मोदी सरकारच्याविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेणारे आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे शिवसेना नेते तथा मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना अगदी अपेक्षेप्रमाणे अमलबजावणी संचलनालय (ईडी)ने तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे. राऊत यांच्यासह त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना अधिक चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले असून, त्यांना थोड्याच वेळात अधिकृत अटक दाखवली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शपथ, आपण कोणताच घोटाळा केला नाही. हे आपल्याला व शिवसेनेला संपवण्याचे भयानक षडयंत्र आहे, अटक झाली तरी आपण भाजपमध्ये जाणार नाही, त्यांच्या सूडसत्राला घाबरणार तर अजिबात नाही, अशी आक्रमक भूमिका खा. राऊत यांनी घेतली आहे. दरम्यान, संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून, ईडीच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी जोरदार नारेबाजी लावली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात केंद्रीय राखीव पोलिस तैनात करण्यात आले होते. संजय राऊतांना ईडी कस्टडी, किवा न्यायालयीन कस्टडी मिळू शकते, अशी शक्यता उज्वल निकम यांना वर्तवली आहे.
भांडूप येथील मैत्र या खासदार संजय राऊत यांच्या बंगल्यांवर आज सकाळी ७ वाजता ईडीच्या १० अधिकार्यांचे पथक पोहोचले. त्यांनी खासदार संजय राऊत व त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांची तब्बल ९ तास चौकशी केली. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आपण चौकशी करत आहोत, असे ईडीने सांगितले. राऊत यांनी चौकशीत सहकार्य केले नाही, असा आक्षेप ठेवत ईडीने अखेर संजय राऊत यांना ताब्यात घेतले व त्यांच्यासह त्यांच्या बंधुंना ईडीच्या कार्यालयात नेले. तेथे थोड्याच वेळात त्यांना अटक दाखवले जाण्याची शक्यता आहे. कालच, ईडीच्या अधिकार्यांनी संजय राऊत यांचा दादर येथील एक फ्लॅट सील केला होता. यास त्यांच्या कुटुंबीयांचीही ईडी चौकशी करत आहेत. ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राऊत यांचे वकील विक्रांत सवणे हे ईडीच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी राऊत यांना काही कायदेशीर हक्क आहेत, ही बाब ईडीच्या अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली.
दरम्यान, ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांनी बाहेर येऊन शिवसैनिकांना अभिवादन केले. यावेळी शिवसैनिकांनी ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोणत्याही परिस्थिती संजय राऊत यांना येथून जाऊ देणार नाही, असा पावित्रा घेल्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. ईडीसाठी पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आता समन्स दिले आहे. त्यासंदर्भात स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिय संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी दिली आहे.
संजय राऊत यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी लक्ष करुन चौकशीचा ससेमीरा लावला. त्यामुळे ईडीने त्यांना ताब्यात घेणं अपेक्षित होतं. केंद्र सरकारच्या जुमली कारभाराविरोधात शिवसेना रान उठवल्याशिवाय राहणार नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. पत्राचाळ आर्थिक व्यवहारात जर काही गदारोळ झाला होता तेव्हाच राऊतांना ईडीने ताब्यात घ्यायचं होतं. ईडीने शिवसेनेच्या बुलंद आवाजाविरोधात कारवाई केलीय. अशा तपास यंत्रणांविरोधात शिवसेना आक्रमक भूमिका घेईल. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांचा नामोहरण करण्याचा प्रयत्न आहे. त्यांना शिवसेना संपवायची आहे. पण संपूर्ण शिवसेना संजय राऊत यांच्या पाठिशी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतल्यावर महिला शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाल्या असून राऊतांच्या घराबाहेर ठिय्या मांडला आहे. संजय राऊत अंगार है, बाकी सब भंगार है, अशा घोषणा देत शिवसैनिक महिला राऊतांना पाठिंबा दर्शवत आहेत.
जी काय कारवाई व्हायची ती होऊ द्या मी घाबरत नाही, ही राजकीय सुडाने चाललेली कारवाई आहे, माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी आहेत. शिवसैनिकांचं बळ माझ्या पाठीशी आहे आणि एक लक्षात घ्या संजय राऊतला महाराष्ट्र ओळखतो देश ओळखतो तो शिवसेनेमुळे आणि हा संजय राऊत कधी गुडघ्यावर चालत नाही आणि फरपट जात नाही. निधड्या छातीने उभा राहतो. कुणी काहीही म्हणू द्या त्यामुळे या कारवाईला सुद्धा मी निधड्या छातीने सामोरे जातोय. यातूनच महाराष्ट्राला सुद्धा बळ मिळेल राजकीय सुडाच्या कारवाया महाराष्ट्रात सुरुवात भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांवर फक्त त्यांनाही यातून बळ मिळणार आहे. आमच्यासारखी ही काही लोक आहेत जी न झुकता न डरता कारवाईला सामोरे जातात आणि लढाई लढतात आणि या अशा कारवाईंच्या भीतीने अनेक लोक पक्ष सोडून जातात. शरणागती पत्करतात. संजय राऊत असा नाही. मरेन पण झुकणार नाही. वाकणार नाही शिवसेना सोडणार नाही. कोणतीही कागदपत्र माझ्याकडे सापडलेली नाहीत. जे काय पत्राचाळ वगैरे म्हणतायेत कोणता पत्रा गंजलेला आहे की स्टीलचा आहे मला माहित नाही. ती चाळ कुठे आहे मला माहित नाही. तरी ठरलेलं आहे की शिवसेना मोडायची तोडायची, माझा आवाज बंद करायचा. उद्धव ठाकरे यांना कमजोर करायचं, त्यासाठी ही कारवाई सुरू आहे. अशाने शिवसेना आणि महाराष्ट्र कमजोर होणार नाही. माझ्यावरच्या कारवाईतून शिवसेना आणि महाराष्ट्राला लढण्याचं बळ मिळेल असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे. ईडीचे अधिकारी आपल्या महाराष्ट्रातील देशातीलच आहे. त्यामुळे त्यांना सहकार्य करायला पाहिजे, मी खासदार आहे त्यामुळे आम्हीच कायदे बनवतो. मला कायद्याचे महत्त्व कळतं, बदल्याच्या भावनेने आणि शिवसेनेला संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी माझ्यावरती कारवाई सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मी जवळचा सहकारी होतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे लढण्याचे सगळे गुण आमच्या मध्ये आलेले आहेत. मी डरपोक नाही कर नाही तर डर कशाला, असा एक प्रश्न मगाशी कोणीतरी विचारला त्यांना सांगतो कर नाही आणि डरही, नाही आणि शेवटपर्यंत पक्ष सोडणार नाही.
– संजय राऊत, खासदार-शिवसेना नेते