खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पुलाबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित

0
दिल्ली : कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील नवले ब्रीज ते कात्रज दरम्यानच्या रखडलेला रस्ता आणि भुयारी मार्गाचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आजलोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केला. त्यावर आगामी सहा महिन्यात हा प्रश्न निकालात निघेल, अशी ग्वाही केंदीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

कात्रज बाह्यवळण महामार्गावर नवले पुलाजवळ सातत्याने होत असलेली कोंडी, सातरकडील बाजूने दरी पुलावरून येणाऱ्या अवजड वाहनांना होणारे जीवघेणे अपघात, कात्रज बाजूकडे प्रलंबित राहिलेली रुंदीकरणाची कामे यांमुळे दिवसेंदिवस या महामार्गावरील वाहितीचे प्रश्न वाढतच चालले आहेत. याशिवाय सतत होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच या रस्त्याचा वापर करावा लागत आहे.

या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन सुप्रिया सुळे या सातत्याने राष्ट्रीय रस्ते महामंडळ आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा करत आहेत. आज लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुन्हा त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्यावर नितीन गडकरी यांनी उत्तर देताना या भागातील एक भुयारी मार्ग पुढील काही दिवसांतच पूर्ण होणार असून आणखी एका पुलाचे काम लवकरच सुरू होईल. तसेच रस्ता रुंदीकरण आणि इतर कामे सुद्धा आगामी सहा महिन्यांत पूर्ण होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.