मुंबई: शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यावर पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याने पीडित महिलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असल्याची माहिती समोर आली आहे.
खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्यावर बलात्कार करत, मानसिक त्रास दिल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.
शेवाळे यांनी २०२० पासून लग्नाचे आमीष दाखवून आपल्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शेवाळे यांचे लग्न झाले असल्याची कल्पना होती. मात्र शेवाळे यांनी पत्नीसोबत वाद होत असून, लवकरच तिच्यापासून घटस्फोट घेणार असल्याची माहिती दिली त्यावर आपण विश्वास ठेवला, असंही यात म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र महिलेने सोशल मिडियावर प्रसिद्ध केले असून सोबत राहुल शेवाळे तिच्या वाढदिवसाला उपस्थित असल्याचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. पोलिसांनी तक्रार न घेतल्यास आपल्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांशी याबाबत संपर्क केला असता, या प्रकरणाची कुठलिही तक्रार अद्याप आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच महिलेचे हे ट्विटर अकाऊंट अधिकृत आहे, का याची खात्रीही केली जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेवाळे यांनी न्यायालयाच्या तक्रारीच्या आधारावर साकीनाका पोलीस ठाण्यात महिलेविरोधात खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.