भोर (माणिक पवार) : महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असून जखमींना वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक प्रवाशांना जीवाला मुकावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाने मृत्युजंयदूतांची निर्मिती केली आहे. अपघातस्थळी मृत्युंजय दूत धावून येणार असल्याने जखमींचे जीव वाचणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांनी सांगितले.
पुणे – सातारा महामार्गावरील कापूरहोळ ( ता. भोर ) येथील महामार्ग वाहतूक पोलीस शाखेत मृत्युंजय दूत अभियानाचे शुभारंभ पत्रकार वैभव धाडवे, माणिक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे बोलत होते. यावेळी मंडलाधिकारी मनीषा भूतकर, रिलायन्सचे सुरक्षा विभागाचे अभिजित गायकवाड, तुळशीराम अहिरे, विक्रम पांगारे, संतोष वाडकर, गोपाळ थेऊरकर, पंढरीनाथ गोळे आदी उपस्थित होते.
प्रवीण रणदिवे यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, राज्यशासन व गृह विभागाच्या संकल्पनेतून मृत्यूजंय दूत मोहीम हाती घेण्यात आली असून अपघात झाल्यानंतर प्रत्यक्षठिकाणी जखमींना प्राथमिक उपचार मिळण्यासाठी परिसरातील युवक – युवतींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात त्यांना प्राथमिक उपचारपेटी स्ट्रेचर दिले जाणार आहे. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते विमा योजनेची माहिती त्यांनी दिली. यावेळी वाहतूक पोलिसांच्या उपक्रमाला पत्रकार माणिक पवार यांनी भोर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस नाईक सचिन भिसे यांनी केले.