मुळशी पंचायत समिती सभापतीची पिस्तूल दाखवून शेतकऱ्यांना मारहाण
परस्परविरोधी गुन्हे दाखल; हिंजवडी-माण येथील प्रकार
पिंपरी : स्वतःच्या जमिनीतून रस्ता आणि गटारच्या कामास हरकत घेतल्याने मुळशी पंचायत समितीच्या राष्ट्रवादीच्या सभापतीने स्वतः जवळील पिस्तुल दाखवून शिवीगाळ केली. तसेच इतरांनी मारहाण करुन परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार हिंजवडी फेज दोन, माण येथे बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. हिंजवडी पोलिसांनी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर सरकारी कामकाजास मज्जाव करुन काम बंद केल्या प्रकरणी शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी रामनारायण एकनाथ पारखी (63, रा. माण) यांनी फिर्याद दिली आहे. तर पांडुरंग मारुती ओझरकर (रा.माण), नितीन बाळू कुंटे (25, रा. चांदे), गणेश शिंदे, रोशन बाळकृष्ण ओझरकर (28, रा. माण), रामदास गवारे, नवनाथ गवारे, यशवंत गवारे (सर्व रा.माण) आणि इतर 2 ते 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सर्व्हे क्रमांक 594 आणि 304 सर्व्हे मध्ये जमीन आहे. पैकी 304 सर्व्हे मधील 3 एकर जमीन एमआयडीसीने हस्तांतरित करुन घेतली असून या ठिकाणी पारखी आणि त्यांच्या भावाची दोन एकर जमीन आहे. या जमिनीतून माण ग्रामपंचायत गटार, रस्ता व इतर कामे करणार असल्याने पारखी यांची त्यास हरकत आहे.
पारखी यांची हरकत असताना देखील एस.के. एंटरप्रायझेस या कंपनीने पारखी यांच्या जमिनीत खोदकाम सुरु केले. यास पारखी यांनी हरकत घेतली आणि पावसाळा संपल्यावर निर्णय घेऊ असे सांगितले. यावरुन चिडून पांडुरंग ओझरकर याने स्वतः जवळील पिस्तुल दाखवून शिवीगाळ केली. तसेच इतरांनी सिमेंटच्या विटेने मारहाण करुन जखमी केले. दगडाने मारहाण केली तसेच गाड्या बोलावून, रस्त्यात आडव्या लावून दहशत निर्माण केली. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
भरत रावण पाटील (55, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. तर महेश रामहारी पारखी, जय रामहारी पारखी, नितीन पारखी, सोमनाथ प्रकाश कसाळे, रामहारी पारखी, सूरज पारखी, रामहारी पारखी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माण ग्रामपंचायतीचे भूगटार कामाचे काम सुपरवायझर आणि कामगार करत असताना पारखी यांनी एकत्र येऊन काम करण्यास मज्जाव केला. काम बंद पाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.