मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर त्यासंदर्भात चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. या मुद्द्यावरून आता शिवसेना विरुद्ध भाजपा असा नवा सामना सुरू झाला असून आज संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
सोमय्या पिता-पुत्रांना बजावण्यात आलेल्या समन्सनंतर ते दोघे घाबरल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. “पोलिसांनी काय समन्स पाठवलेत, हे मला माहिती नाही. पण जबाबासाठी समन्स पाठवल्याचं कळतंय. त्याशिवाय, आयएनएस विक्रांतच्या नावावर लोकांकडून कोट्यवधी गोळा करणारे दोघं बापबेटे पोलिसांसमोर जायला घाबरत आहेत. म्हणून ते अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले आहेत. पण कर नाही तर डर कशाला ही तुमचीच भाषा आहे ना?” असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे.
दरम्यान, देवळात ठेवलेल्या पेटीचाही हिशोब धर्मादाय आयुक्तांना द्यावा लागतो. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनीही यांच्यावर कारवाई करायला हवी, असं राऊत म्हणाले आहेत. “तुम्ही आयएनएस विक्रांतच्या नावावर लोकांकडून पैसे गोळा केले आहेत. ५८ कोटी रुपये गोळा केले. हा पोलीस तपासाचा भाग आहे. तुम्ही पैसे गोळा केले, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. धर्मादाय आयुक्तांनी देखील यांच्यावर कारवाई करायला हवी. त्यांच्या परवानगीशिवाय असे पैसे गोळा करता येत नाहीत. देवळात पेटी ठेवता त्याचा देखील हिशोब धर्मादाय आयुक्तांना द्यावा लागतो”, असं राऊत म्हणाले आहेत.