मिळकतकर न भरल्यास महापालिकेची जप्तीची कारवाई

0
पिंपरी : मिळकतकर अभय योजना करसंकलन विभागामार्फत चालू वर्षात मिळकत करापोटी 495 कोटी रुपये वसूल झाले आहेत. अंदाजपत्रकीय उद्दीष्टापेक्षा 375 कोटी रुपयांनी मिळकत कर वसूल कमी असल्याने महानगरपालिकेमार्फत मोठ्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करणे अथवा जप्ती अनुषंगिक कठोर कारवाईची सुरु आहे. तसेच अशाप्रकारची कारवाईही मार्च महिन्यानंतरही सातत्याने सुरु राहणार आहे . शासनाने एक वेळची विशेष बाब म्हणून अवैध बांधकाम शास्ती वगळून मूळ कर भरणा करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यतच सवलत दिलेली आहे . त्यानंतर कठोर कारवाईद्वारे थकबाकी वसूल करणेचे निर्देश दिलेले आहेत.

तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी मिळकत कराचा भरणा करणेचे दृष्टीने 31 मार्च 2021 अखेर थकबाकीसह संपूर्ण कराचा भरणा करणा-या मिळकतधारकांना मनपा शास्ती करामध्ये विलंब दंड 75 % सवलत देण्यात येत आहे . आज पर्यंत सवलत योजने अंतर्गत 7401 मिळकतधारकांनी लाभ घेतला असून 88.49 कोटी रुपये मिळकत कराचा भरणा केला आहे.

परंतु वरील सवलती लागू असूनही ज्या मिळकतधारकांनी अद्यापही मिळकत कराचा भरणा केला नाही व ज्यांची थकबाकी 25 लाखापेक्षा जास्त आहे, अशा थकबाकीदारांची यादी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केली असून त्यांची नावे क्षेत्रिय कार्यालय व विभागीय कार्यालयाचे दर्शनी भागात प्रसिध्द करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने सर्व करसंकलन विभागीय कार्यालयात साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीचे दिवशी मिळकत कराची रक्कम रोख / धनादेश / डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करता येईल .

तसेच महानगरपालिकेचे www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर मिळकत कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. सर्व मिळकतधारकांनी मिळकत कराच्या विविध सवलत योजनांचा लाभ घ्यावा व आपल्या थकीत मिळकत कराचा भरणा 31 मार्च पूर्वी करावा असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे. अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.