याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक वाघेरे यांनी म्हटले आहे की, शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये भयानक वाढ होत आहे. रुग्णवाढीचा आलेख चढताच आहे. तो कमी होताना दिसत नाही. वाढती रुग्णसंख्या पाहता हा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येत गंभीर, अतिगंभीर रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या रुग्णांना रेमडिसेवीर इंजेक्शन उपयुक्त ठरत आहे.
शहरातील सामान्य नागरिकांना बाजारातील रेमडिसेवीर इंजेक्शनचे दर परवडणारे नाहीत. असे असताना महापालिकेकडे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. अतिगंभीर रुग्णांना रेमडिसेवीर इंजेक्शन मिळत नाही. त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. काळ्या बाजारात चढ्या दराने रेमडिसेवीरची विक्री केली जात आहे. अशी अभूतपूर्व, भयानक परिस्थिती असतानाही महापालिका इंजेक्शनची खरेदी करत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.
रेमडिसेवीरचा प्रचंड तुटवडा आहे. लोक हवालदिल झाले आहेत. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत इंजेक्शनची खरेदी थांबविली हे दुर्देव आहे. शहरातील नागरिकांच्या आराेग्याची जबाबदारी ही महापालिकेची असल्याने आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात रेमडिसेवीरची खरेदी करून शहरातील नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी प्रयन्त करावेत, अशी विनंती नगरसेवक वाघेरे यांनी केली आहे.