पिंपरी : शहरात डेंगू व इतर जीव घेण्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक चिंचवड विधानसभा अध्यक्ष कुणाल थोपटे यांनी केली आहे.
सध्या रहाटणी, काळेवाडीसह इतरत्र डेंगू सदृश्य लक्षणे असलेले ताप, अंगदुखी, सर्दी, पडसे, डोकेदुखी व इतर साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. सरकारी व खासगी दवाखान्यात अशा रुग्णांची संख्याही वाढली आहे. विशेषता काळेवाडी, रहाटणी परिसरात अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने रस्त्यालगत अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यावर डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. डासांच्या वाढत्या उपद्रवामुळे आणि साथीच्या आजारामुळे सर्वसामान्य जनता त्रासुन गेली आहे.
कुणाल थोपटे म्हणाले, कोरोनाचे संकट डोक्यावर असतांना आता डेंग्यू व इतर साथीच्या आजारानी नागरिकांचे जगणे मुश्किल केले आहे. त्यामुळे सध्या वाढत असलेले साथीचे आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गल्लोगल्ली धूर फवारणी तसेच स्वच्छतेकडे विशेष देवून ठोस उपाय योजनेकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावे तसेच साथीचे आजार वाढणार नाही यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी.