अठरा वर्षावरील सर्वांना महानगरपालिका मोफत लस देणार : ॲड. नितीन लांडगे

ऑक्सीजन जनरेटींग प्लांटची वीस दिवसात चार रुग्णालयात उभारणी

0

पिंपरी : कोरोनाच्या जागतिक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण प्रभावी ठरणार आहे. केंद्र सरकारने जाहिर केल्याप्रमाणे 1 मे 2021 पासून देशातील 18 ते 45 वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. कोरोना कोविड – 19 चे रुग्ण पिंपरी चिंचवड शहरात देखिल वेगाने वाढत आहेत. यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील 18 ते 45 वर्ष वयोगटातील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याबाबत भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि माजी शहराध्यक्ष ज्येष्ठ आमदार लक्ष्मण जगताप यांनी सूचना केली होती. त्यानुसार बुधवारच्या (दि. 28 एप्रिल) स्थायी समितीच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिकेच्या वतीने 55 आणि खासगी 11 केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. सध्या लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरात साधारणता: 25 लाख लोकसंख्या आहे. प्रत्येकाला कोरोना प्रतिबंधक लस दोन वेळा घ्यावी लागते. शहरातील सर्व नागरिकांना मोफत लस उपलब्ध करुन दिल्यास जास्तीत जास्त नागरीक लस घेतील आणि कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल. यासाठी सर्वांना मोफत लस देण्यात येणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

महापालिकेच्या विविध रुग्णालयात दाखल असणा-या कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे. यासाठी थेरगाव, भोसरी, जीजामाता आणि आकुर्डी या चार रुग्णालयांमध्ये ‘मेडिकल ऑक्सीजन जनरेटींग प्लांट’ थेट पध्दतीने खरेदी करण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याच्या दरपत्रकाबाबत वैद्यकीय तज्ञ समितीने 25 एप्रिलच्या बैठकीतील दिलेल्या अहवालानुसार दर कमी करुन प्राप्तचे दर स्विकृत करण्यात आले आहे. त्यानुसार थेरगाव रुग्णालयासाठी मे. ड्रग हाऊस पुणे या पुरवठादारांकडून एक युनिट साठी (1050 एलपीएम) 1 कोटी 90 लाख रुपये अधिक जीएसटी, भोसरी, आकर्डी आणि जीजामाता रुग्णालयात (960 एलपीएम) प्रत्येकी एक युनिट साठी मे. प्राईम सर्जिकल ॲड फार्मा चिंचवड या पुरवठादारांकडून एक युनिट साठी 1 कोटी 40 लाख रुपये अधिक जीएसटी इतका खर्च अपेक्षित आहे. वरील सर्व युनिट वीस दिवसात कार्यान्वित होतील, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.

कोरोनाची बाधा झाल्यामुळे मृत पावलेल्या व्यक्तींचा अंत्यविधी करण्यासाठी महानगरपालिका सहा हजार रुपयांची मदत देत आहे. परंतू हे अंत्यविधीचे काम करणा-या कर्मचा-यांना ‘पीपीई’ किट आणि सॅनिटायझर देणे आवश्यक आहे. त्यासाठी आणखी दोन हजार रुपये प्रत्येक अंत्यविधीसाठी देण्याचा एैनवेळचा विषय आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आता प्रत्येक मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी आठ हजार रुपये देण्यात येणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी सांगितले.

शहरातील बाधित रुग्णांचे क्वॉरंटाईन सेंटरमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे आणि बाधित रुग्ण होम आयसोलेशनचा पर्याय निवडत असल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रूग्ण होम आयसोलेशनचा पर्याय निवडू शकतात असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. परंतू शहरात आयुक्त हे राज्य शासनाचे प्रतिनिधी असतात आणि आम्ही लोक प्रतिनिधी आहोत त्यामुळे आपल्या नागरीकांचे हित पाहणे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या जिविताचे रक्षण करणे आवश्यक आहे.

महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये जागा उपलब्ध आहेत. एखाद्या रुग्णाचा कोरोना तपासणी अहवाल सकारात्मक येताच ताबडतोब त्या रुग्णाला किमान पाच दिवस तरी मनपाच्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये दाखल करावे, अशीही सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना बुधवारच्या बैठकीत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.