महापालिकेच्या उपअभियंत्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी

0

पुणे :  शाळा आणि स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पुणे महापालिकेच्या उपअभियंत्याला विशेष न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.

 

 

सुधीर विठ्ठल सोनावणे (वय ५१, रा. टिंगरेनगर) असे पोलिस कोठडी सुनावलेल्या उपअभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार असून त्यांनी २०१८-१९ मध्ये महापालिकेच्या तीन शाळा आणि करोना काळात स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे काम केले होते.

 

 

शाळांच्या दुरुस्तीचे बिल मंजूर करण्यासाठी आणि स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामाचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून उपअभियंता सोनावणेने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यातील  ४० हजार रुपये स्विकारताना सोनावणेला अटक करण्यात आली. सोनावणे याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्यामध्ये आणखी आरोपी असण्याची दाट शक्यता आहे का, त्याबाबत तपास करायचा आहे, आरोपीच्या आवाजाचा नमुना घ्यायचा आहे, आरोपीने लाचेची मागणी स्वत:साठी की अन्य कोणासाठी केली होती, याचा तपास करायचा आहे, त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

Leave A Reply

Your email address will not be published.