दुचाकी गाडीवर दगड मारल्याच्या रागातून एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना कोंढवा परिसरातील शिवनेरीनगर येथील पारसी मैदानासमोरील पाण्याच्या टाकीच्यामागे मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास उघडकीस आली होती. दरम्यान अवघ्या पाच तासात गुन्ह्याचा छडा लावत गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या. अतिश सुरेश वायदंडे (वय 23 रा. शिवनेरी नगर कोंडवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
तर ज्ञानोबा गंगाधर धनगे (वय.43,रा. शिवनेरीनगर कोंढवा. मुळ गंगाखेड जि. परभणी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे नातेवाईक कृष्णा रमाकांत हाके (वय.26,रा. महादेवनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वायदंडे याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत धनगे व आरोपी वायदंडे हे एकमेकांच्या तोंडओळखीचे आहेत. दरम्यान धनगे हा सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास मद्यप्राशन करून पाण्याच्या टाकीच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानात राडा करत होता. यावेळी येणार्या -जाणार्यांना शिवीगाळ करत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. त्याचवेळी वायदंडे हा तेथील परिसरातून दुचाकीवरून निघाला असता, त्यांच्या दोघात बाचाबाची झाली. धनगे याने वायदंडेला दगड फेकून मारला. तो दगड वायदंडेच्या दुचाकीच्या टाकीला लागता. त्यातूनच आपली पहिली गाडी असल्याने दगड लागल्याचा पाहून वायदंडेला धनगेचा राग आला. यानंतर चिडलेल्या वायदंडेने धनगेला धक्का मारून डोक्यात दगड घातला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी वायदंडेने तेथून पळ काढला होता. सकाळी हा प्रकार उजेडात येताच कोंढवा पोलिस व गुन्हे शाखेच्या पथकांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली होती.
यावेळी गुन्हे शाखा युनिट 5 चे सहायक पोलिस निरीक्षक लोणारे यांना बातमीदारामार्फ माहिती मिळाली होती की धनगे याचा खून अतिश वायदंडे याने केला आहे. त्यानुसार सापळा रचून वायदंडेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या प्राथमिक तपासात त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. अवघ्या पाच तासात पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात यश आले.