पिंपरी : काळेवाडी, रहाटणी येथे एका सराईत गुन्हेगारावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत निर्घृणपणे खून केला. ही घटना रविवारी (दि. 27) सायंकाळी घडली.
निशांत सुरवसे (22, रा. सज्जनगड, राहटणी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत रविवारी मित्रांसोबत रहाटणी येथील त्याच्या बहिणीकडे गेला होता. त्यावेळी कारमध्ये आलेल्या आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे निशांतच्या मित्रांनी त्याला सोडून पळ काढला.
आरोपींनी निशांतच्या डोक्यावर कोयत्याने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. वाकड पोलिसांनी रात्री उशिरा काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. दोन गटाच्या वर्चस्ववादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
निशांत सुरवसे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.