प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा गळा आवळून खून
गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे आरोपी नागपूरमधून ताब्यात
पिंपरी : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा पतीने गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. पत्नीने आत्महत्या केली असल्याचे सांगून प्रियशीला घेऊन नागपूरला फरार झालेल्या पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री भुजबळवस्ती, वाकड येथे घडली.
कीर्ती आशिष भोसले-बेडेकर (२०, रा. वाकड) हिचा खून झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष भोसले आणि कीर्ती या दोघांची ओळख सोशल मीडियावर झाली. त्यानंतर दोघांनी घर सोडून जाऊन लग्न केले आणि दोघे वाकड येथे राहू लागले.
कीर्ती ही बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याची माहिती मंगळवारी रात्री हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी किर्तीला रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांना संशय आल्याने तपास सुरु केला. किर्तीच्या मामीला फोन करुन माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आशिष वर संशय व्यक्त केला.
दरम्यान हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये त्याच दिवशी मारूंजी येथून एक तरुणी मिसिंग दाखल झाली असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांना अधिक संशय बळावला.
हिंजवडी पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस संयुक्तपणे तपास करत होते. त्याचवेळी बेपत्ता तरुणी आणि आशिष हे दोघे नागपूर शहरात असल्याची माहिती मिळाली.
गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी नागपूर, सीताबर्डी पोलिसांशी संपर्क साधून दोघांना ताब्यात घेण्यास सांगितले. तसेच चौकशी करायला सांगितले. त्यावेळी हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आशिष आणि बेपत्ता तरुणी या दोघांना ताब्यात घेतले आहे.
आशिष भोसले याने बेपत्ता तरुणीला पत्नीने आत्महत्या केली असल्याचे सांगितले. तसेच तू सोबत आली नाही तर मी स्वतः आत्महत्या करेल अशी धमकी देऊन तिला सोबत घेऊन गेला आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस नागपूरला रवाना झाले आहेत.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघडकीस आणण्यासाठी हिंजवडीचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, गुन्हे शाखा युनिट चारचे निरीक्षक मच्छिद्र पंडित, सहाय्यक निरीक्षक देशमुख, सिद्धनाथ बाबर, गणेश रायकर, आदिनाथ मिसाळ, नागपूर, सीताबर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी काम केले.