पिंपरी : दारु पिल्यानंतर 200 रुपयावरुन झालेल्या वादातून दोघांनी एकाचा खून केला. हा प्रकार 24 जानेवारी 2017 रोजी सकाळी निरझरा पार्क सोसायटी समोरील मोकळ्या जागेत रहाटणी येथे उघडकीस आला. या गुन्ह्यातील दोन आरोपींना वाकड पोलिसांनी चार वर्षानंतर अटक केली आहे.
अंकुश दिलीप खडसे (30, रा. भारतमाता चौक, काळेवाडी), विष्णू देवराव चित्ते (31, रा. रहाटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी आंबेडकर पुतळा चौक पिंपरी येथे दारू प्यायला बसले होते. त्यावेळी मृत व्यक्ती दारू पिलेल्या अवस्थेत आरोपींजवळ आला. त्याने आरोपींकडे दारूची मागणी केली. आरोपींनी त्याला खाली बसवून दारू प्यायला दिली.
दारू पिल्यानंतर तिघेजण विष्णू याच्या दुचाकीवरून पिंपरी स्मशानभूमीजवळ गेल्यावरून आरोपींनी मयताची झडती घेतली. त्याच्या खिशातून 200 रुपये काढून घेतले. त्यावेळी मयताने आरोपींना प्रतिकार केला. त्यानंतर आरोपींनी मृत व्यक्तीला दुचाकीवरून निरझरा पार्क सोसायटी समोरील मोकळ्या जागेत रहाटणी येथे नेले. त्याच्या डोक्यात, मानेवर, हनुवटीजवळ फरशीने मारून खून केला.
या गुन्ह्याचा तपास वाकड पोलीस मागील चार वर्षांपासून करीत होते. पोलीस अंमलदार नितीन गेंगजे यांना माहिती मिळाली की, या खून प्रकरणातील आरोपी पिंपरी येथील केएसबी पंप कंपनीसमोर येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी अंकुश याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या एका साथीदारासोबत मिळून हा खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचा साथीदार विष्णू यालाही अटक केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील टोणपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, संतोष पाटील, संभाजी जाधव, पोलीस अंमलदार नितीन गेंगजे, प्रमोद कदम, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रशांत गिलबिले, सुरज सुतार, बिभीषण कन्हेरकर, राजेंद्र मारणे, बाबाजान इनामदार, बापू धुमाळ, नितीन ढोरजे, वंदू गिरे, रवींद्र काळे, तात्या शिंदे, जावेद पठाण, कौंतेय खराडे, शाम बाबा, आतिष जाधव, कल्पेश पाटील, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली आहे.