पिंपरी : तळेगाव दाभाडे येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका 17 वर्षाच्या मुलाचा अज्ञातांनी पिस्तूलातुन गोळ्या झाडून खून केला. ही घटना बुधवारी (दि. 23) मध्यरात्री नॅशनल हेवी कंपनीजवळ तळेगाव दाभाडे येथे घडली.
दशांत अनिल परदेशी (17, रा. तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील अनिल परदेशी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील नॅशनल हेवी कंपनीजवळ गुरुवारी मध्यरात्री अज्ञातांनी दशांत परदेशी याच्यावर गोळीबार केला. त्यात गंभीर जखमी होऊन दशांतचा मृत्यू झाला. याबाबत रात्री साडेबारा वाजता तळेगाव दाभाडे पोलिसांना माहिती मिळाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
दशांतवर कुणी आणि का हल्ला केला, याबाबत अद्याप पोलिसांनाही समजलेले नाही. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.