पिंपरी : खेड तालुक्यातील निघोजे गावात सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या जेष्ठ महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलावण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
तान्हाबाई बबन येळवंडे (६५ , रा. निघोजे, ता. खेड ) खून झालेल्या जेष्ठ महिलेचे नाव आहे. महाळुंगे पोलिसांत या बाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
गुरुवारी (दि. २ जून ) पहाटे पाचच्या सुमारास निघोजे – मोई रस्त्यावर तान्हाबाई येळवंडे या फिरण्यासाठी गेल्या असता अज्ञाताने त्यांच्यावर लोखंडी टणक हत्याराने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना मोशी ( ता. हवेली ) येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना शुक्रवारी (दि.३ जून ) त्यांचा मृत्यू झाला. या बाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे महाळुंगे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान या घटनेच्या संदर्भातील काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाली असून त्याआधारे तपास सुरु असल्याचे समजते.