किरकोळ कारणावरून कामगाराचा खून; 12 तासाच्या आत अल्पवयीन ताब्यात

0

पिंपरी : मारहाण करून डोक्यात दगड घालून कामगाराचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 31) रात्री नऊ वाजताच्या सुमारास चिखली येथे घडली.

सुनील शिवाजी सगर (35, रा. जाधववाडी, चिखली. मूळ रा. लातूर) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. मयत सगर यांच्या 25 वर्षीय पत्नीने याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 14 वर्ष आणि 17 वर्ष वयाच्या दोन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनील हे एका खासगी कंपनीत काम करीत होते तसेच ते एका गोठ्यात सफाईचे काम करत होते. शुक्रवारी रात्री कंपनीतून सुटल्यानंतर ते चिखली मधील एका गोठ्यामध्ये सफाईच्या कामासाठी जात होते. जाधववाडी येथून रस्त्याने पायी जात असताना एका दुचाकीचा त्यांना धक्का लागला. सगर यांनी दुचाकीवरील एका मुलाला कानशिलात लगावली. त्याचा राग आल्याने दुचाकीवरील दोघांनी सगर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

अचानक झालेल्या हल्ल्यानंतर जीव वाचवण्यासाठी सुनील हे एका दुकानात घुसले. मात्र, अल्पवयीन मुलांनी सुनील यांना दुकानाबाहेर ओढले आणि त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्यात सुनील यांचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलांनी त्यांच्या मित्राची दुचाकी आणली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका सीसीटीव्हीमध्ये दोघेजण दुचाकीवरून गेल्याचे दिसले. त्या दुचाकीची माहिती काढून पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस नाणेकर, सावंत, होले, चोरघे, सपकाळ यांनी चौकशी केली असता दुचाकीच्या मालकाच्या मुलाने त्याच्या दोन मित्रांना दुचाकी दिल्याचे समोर आले. दोघे मित्र त्यांच्या मित्राला भेटायला जाणार होते. मित्राला भेटून येताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.