पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये वेडा म्हणून चिडवल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. टोळक्याने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना पिंपरीतील मिलिंद नगर येथील डिलक्स चौकात 5 ऑगस्ट रोजी तीनच्या सुमारास घडली. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा रविवारी सव्वा पाचच्या सुमारास मृत्यू झाला.
मनोज राजु कसबे (25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. काळ्या उर्फ सचिन निकाळजे (40 रा. क्यु बिल्डींग, मिलिंद नगर, पिंपरी), शौकत समीर शेख (32 रा. बिल्डींग नं.4, मिलिंदनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर चिम्या उर्फ सुरेश निकाळजे, मनोज अर्जुन जगताप, आनंद कदम, संतोष कदम, भुषण डुलगल इतर साथिदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत मनोज याची आई पुष्पा राजु कसबे (50, रा. डी. बिल्डींग, मिलिंद नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या मनोजला आरोपी हे दररोज ‘तू वेडा आहेस’ असे चिडवत होते. मी वेडा नाही असं मनोज वारंवार त्यांना सांगत होता. तरी देखील आरोपी त्याला तू वेडा आहेस म्हणून चिडवत होते. त्यामुळे संतापलेल्या मनोजने आरोपींसोबत वाद घातला. यानंतर आरोपींनी मनोजला काठीने मारहाण केली. तसेच लाथा बुक्क्यांबरोबरच खुर्ची, लाकडी दांडके आणि लाकडी स्टंपने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मनोजला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तीन दिवसांनी मनोज याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.