पुणे : जमिनीच्या वादातून सावत्र भावाचा खून केल्यानंतर ओडीशात पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या अल्पवयीन भावाला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले.
ही घटना शुक्रवारी (दि.30) रात्री लोहगावमधील साठेवस्ती येथे घडली घडली. सीताराम कांदन हेंबरम (23, रा. साठेवस्ती, लोहगाव, मूळ. रा. ओडीशा) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर, त्याच्या अल्पवयीन (वय 16) भावाला ताब्यात घेतले आहे. दोघेही मूळ ओडीशा राज्यातून कामानिमित्त पुण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम हा त्याच्या भावासह कामानिमित्त पुण्यात राहण्यासाठी आला होता. साठेवस्ती येथे दोघेही एकाच रूमवर राहायचे. सीताराम हा कन्स्ट्रक्शनमध्ये मजुरीचे काम करायचा. त्याला दारूचे व्यसन होते. शुक्रवारी (दि.30) रात्री रूमवर आल्यानंतर त्याने दारू पिऊन भावाला शिवीगाळ केली. गावाकडील जमिनीचा वाद आणि सातत्याने दारू पिऊन शिवीगाळ या रागातून अल्पवयीनाने लोखंडी रॉडने सीताराम याला मारहाण केली.
यात गंभीर जखमी झालेल्या सीताराम याला तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर अल्पवयीन हा ओडीशातील त्याच्या मूळ गावी जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी सचिन जाधव आणि रूपेश पिसाळ यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याला लोहगाव बसस्थानकावरून ताब्यात घेतले.