पिंपरी : चाकण (म्हाळुंगे) परिसरामध्ये एका महिलेच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करुन दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली होती. हा खून प्रेमप्रकरणातून प्रियकरानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने कोणताही सुगावा नसताना 24 तासात आरोपीला अटक केली आहे. ही घटना खराबवाडी गावच्या हद्दीमध्ये रविवारी (दि.20) दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली होती.
निकिता संभाजी कांबळे (28 सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, मुळ रा. कवठा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी निकीताचा प्रियकर राम कुंडलिक सूर्यवंशी (39 रा. पवारवस्ती, दापोडी, पुणे) याला पोलिसांनी पुण्यातील सिम्बायोसिस परिसरातून अटक केली आहे.
चाकणच्या (महाळुंगे) खराबवाडी येथील वाण्याचा मळा या ठिकाणी झुडपात 25 ते 27 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी परिसरातील 90 सीसीटीव्ही तपासले. पोलीस महिलेची ओळख पटवत असताना ही महिला खराबवाडी येथे राहात असून शनिवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी मयत महिलेचा मोबाईल नंबर प्राप्त करुन त्याचा तांत्रिक विश्लेषात्मक तपास केला. महिलेच्या कॉल रेकॉर्डवरुन संशयीत राम सुर्यवंशी याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कौशल्यपुर्ण तपास केला असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी आणि मयत हे पूर्वी एकत्र काम करत असताना त्यांच्यात प्रेम झाले होते. यानंतर निकिताचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपीला आला. आरोपीचे लग्न झाल्याने त्याच्या घरच्यांना प्रेमसंबंधाची माहिती झाली होती. त्यामुळे आरोपीची पत्नी त्याच्यासोबत बोलत नव्हती. तसेच निकिता देखील त्याच्यासोबत न बोलता दुर्लक्ष करीत होती. याचा राग आल्याने त्याने निकिता कांबळेचा खून केल्याची माहिती आरोपीने दिली.