पिंपरी : बिलाअभावी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह तीन दिवस ‘ कोल्ड स्टोरेज’मध्ये ठेवणाऱ्या तळेगांव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेज प्रशासनावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणत याप्रकरणी कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली होती.
त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कॉलेज प्रशासनावर कलम २ ९७ अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश शंकर लोके (५०) यांचा मायमर मेडिकल कॉलेजने उभारलेल्या कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. बिलाचे पैसे दिले नसल्याने कॉलेजने नातेवाईकांना मृतदेह देण्यास नकार दिला. त्यावरून खासदार बारणे यांनी कॉलेजमध्ये जात प्रशासनाला खडेबोल सुनावले होते.संताप व्यक्त केला होता.
याप्रकरणी कोरोना आढावा बैठकीत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती . याप्रकरणी गणेश यांचा मुलगा सुधीर गणेश लोके (२३, रा.मळवली, मावळ) याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार मायमर कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुधीर याचे वडिल गणेश लोके यांना कोरोनाचे निदान झाल्याने मायमर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान गणेश लोके यांचा १ मे रोजी मृत्यू झाला. फिर्यादी यांनी बिल न भरल्याने मायमर मेडिकल कॉलेज प्रशासनाने गणेश लोके यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता तीन दिवस ‘कोल्ड स्टोरेज’ मध्ये ठेवला होता. मृतदेहाची अप्रतिष्ठा केल्यामुळे मायमर कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.