मुंबई : सचीन वाझे यांना कार घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन वाझे प्रकरणावरून काँग्रेस नेत्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. नाना पटोले आणि सचिन सावंत यांनीच कार घेण्यासाटी वाझेंना मदत केल्याची माहिती पुढे येत आहे. आपल्याकडे चौकशीचा अंगुली निर्देश होऊ नये म्हणून या दोन्ही नेत्यांकडून बिनबुडाचे आरोप सुरू आहेत. याची तपास यंत्रणेने चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.
एका एपीआयला वाचवण्याची सरकार धडपड का करत आहे, हे आता दिसून आलं आहे. वाझेंच्या गाडीत नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. यावरून हाच का तो ठाकरे सरकारचा ‘किमान समान कार्यक्रम’ आहे का हे दिसून आलं आहे, असा टोला लगावतानाच एका एपीआयला पैसे मोजण्याची मशीन का लागत होती? वाझे ही मशीन घेऊन का फिरत होते? असा सवालही त्यांनी केला.