मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांना ED कडून अटक झाली आहे. एकीकडे मलिक कोर्टात पोहोचले असून युक्तीवादाला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीची बैठक बोलावली असून सिल्वर ओकवर राष्ट्रवादीचे मोठ्या मंत्री पोहोचताना दिसत आहेत. त्यामुळे आता या बैठकीकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय निर्णय घेतो, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. सिल्वर ओक बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महसुल मंत्री बाळासाहेब पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आपला दौरा रद्द करून बैठकीसाठी आले आहेत.
या बैठकीनंतर राष्ट्रवादीची पुढची काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सेशन कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले आहेत.
त्यामुळे पोलिसांनीही खबरदारी घेत पोलीस फौजफाटा वाढवला आहे. मलिकांवरील कारवाई ही सुडबुद्धीने झाली असल्याचं महाविकास आघाडीतील नेत्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या बैठकीला काँग्रेस नेतेही उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे.