नवी दिल्ली : मुंबई ड्रग्ज केसबाबत मोठी माहिती समोर येत आहे. आता मुंबई एनसीबी या प्रकरणाचा तपास करणार नाही. या केसमध्ये शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान अडकला आहे. दरम्यान, याशिवाय राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाच्या विराधात सुरू असलेल्या प्रकरणाचा तपास देखील मुंबई झोनकडून काढून घेण्यात आल्याचं वृत्त विविध मराठी आणि हिंदी वृत्त वाहिन्यांनी दिलं आहे. दरम्यान, प्रकरणाच्या तपासातून मला वगळण्यात आले नसून प्रकरणांचा तपास दिल्ली एनसीबीकडून केला जाणार असल्याचं समीर वानखेडे यांनी स्पष्ट केलं आहे.
एनसीबीच्या मुंबई झोनकडून आर्यन खानसह एकुण 6 केस परत घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे एनसीबीचे डायरेक्टर समीर वानखेडे यांना मोठा धक्का बसला आहे. आर्यन खान आणि नवाब मलिक यांच्या जावयाच्या केसचा तपास जरी मुंबई झोनकडून परत घेण्यात आला असला तरी मुंबई झोनचे डायरेक्टर समीर वानखेडे हे त्या पदावरच आणि मुंबई झोनमध्येच कार्यरत राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एवढेच नव्हे तर त्यांच्याविरूध्द तक्रारीचा पाढाच वाचला होता. गेल्या अनेक दिवसांपासुन नवाब मलिक विरूध्द समीर वानखेडे असा जोरदार सामनाच सुरू असल्याचं चित्र आहे. त्या दरम्यानच केंद्रात सत्ताधार आणि राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या अनेक नेत्यांनी समीर वानखेडे यांना पाठिंबा दर्शविला होता तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी समीर वानखेडे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन वानखेडे यांना पाठिंबा दर्शविला होता. आता आर्यन खान, नवाब मलिक यांच्या जावयासह इतर 6 प्रकरणे एनसीबीनं मुंबई झोनकडून परत घेतल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. तर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना मोठा धक्का बसला आहे.