मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करुन भांडाफोड करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे काम सुरूच आहे. आज शुक्रवारी आणखी एक आरोप केला आहे. मुंबई येथे वानखेडे यांचा एक बार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच परमिट रुमचा परवाना वानखेडे यांच्या नावावर घेण्यात आला होता. शासकीय अधिकारी नोकरी करत असताना व्यवसाय करू शकत नाही. आता तरी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मलिक यांनी केली.
नवी मुंबईत सद्गुरू नावाने हा रस्टो बार आहे. याबाबत मलिकांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मलिक म्हणाले, समीर वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात होते. वाशी येथे 1997-98 मध्ये एक हॉटेल सद्गुरू सुरू करण्यात आले. त्याचा परवाना समीर वानखडे नावाने नुतणीकरण करण्यात आले. त्यावेळी वानखेडे यांचे वय 17 वर्षे 10 महिने होते. हा परवाना 2022 पर्यंत वानखडे यांच्या नावावर आहे.
कमी वयाच्या मुलाच्या नावाने परवाना घेण्यात आला. 18 वर्षाच्या खालील लोकांना परवाना दिला जात नाही. शासकीय अधिकारी शासन नोकरी करत असताना व्यवसाय करू शकत नाही. हा नियमभंग आहे. आता तरी त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांना अजून वाचवलं तर केंद्र आणि भाजप त्यांना वाचवत आहे, असा त्याचा अर्थ होईल, अशी टीका मलिकांनी केली.