शरद पवार यांच्या वाढदिवसा दिवशी सत्ताधारी भाजपला दणका देण्याच्या तयारीत राष्ट्रवादी

0

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला दणका देण्याची तयारी शहर राष्ट्रवादी करत आहे. यामुळे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण, भारतीय जनता पक्षातील डझनभर आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या १२ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणार आहे. यासाठी स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘‘मास्टर प्लॅन’’ तयार केला असल्याचे बोलले जात आहे. एकंदरित भाजपाला खिंडार पाडून पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा फडकवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी होताना दिसत आहे.

पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.  मात्र २०१७ मध्ये भाजपाने अक्षरशः राष्ट्रवादीच्या हातून सत्ता खेचून आणली होती. सत्तेच्या काळात भाजपावर अनेक आरोप झाले आहेत. विशेष म्हणजे, पदवाटप आणि मानपानाच्या नाट्यामध्ये काही नगरसेवकांना महत्त्वाच्या पदांवर संधी मिळाली नाही. त्यामुळे काहीजण भाजपाच्या स्थानिक नेत्यांवर नाराज आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राष्ट्रवादीला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे ‘होमपीच’ असलेल्या भोसरीच्या गावजत्रा मैदानावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वत: शरद पवार किंवा अजित पवार यांना उपस्थित राहण्यासाठी आग्रह करण्यात येत आहे. पवार यांची वेळ मिळण्याची प्रतीक्षा असून, ‘‘साहेब उपस्थित राहिल्यास कार्यक्रम दणक्यात यशस्वी करू’’ असा निर्धार भाजपामधील एका नाराज नगरसेवकाने केला आहे. विशेष म्हणजे, खासदार डॉ. अमोल कोल्हे याबाबत आग्रही असल्याचेही समजते आहे. दुसरीकडे, महापालिका निवडणूक आरक्षण सोडत  आणि प्रभाग रचना जाहीर झाली नसल्यामुळे निर्णय घेता येत नाही, असाही सूर आहे.

पिंपरी-चिंचवडमधील सत्ताधारी भाजपाला या शहरातील नागरिक कंटाळले आहेत. पक्षातील कार्यकर्त्यांची कुचंबणा होत आहे. नगरसेवक, पदाधिकारी देखील दबावाखाली काम करतात. हे लपून राहिलेले नाही. भाजपा गेल्या पाच वर्षांत एकही चांगले काम करू शकलेले नाही. नागरिकांना दररोज पाणी पुरवठा देखील करण्याची नियोजन क्षमता यांच्यामध्ये नाही. भाजपचा हा नाकर्तेपणा आम्ही नागरिकांसमोर घेऊन जाणार आहोत. पिंपरी चिंचवड शहरात २०२२ मध्ये सत्ता बदल होणार हे निश्चित आहे आणि महापौर राष्ट्रवादीचा करायचा हे आम्ही निश्चित केले आहे, अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.