मुंबई ः धनंजय मुंडेवर झालेल्या आरोपांंवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपलं मत मांडले आहे. राऊत म्हणाले की, “धनंजय मुंडेंनीच हा प्रश्न सोडविला पाहिजे. कारण, तो त्यांचा वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील. राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेण्यासाठी प्रगल्भ आहेत. काय निर्णय घ्यावा आणि काय नाही, याचा अनुभव त्यांना जास्त आहे”, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
“पोलिसांनी बलात्काराची तक्रार करून घेतली नाही, यावर मी काहीही बोलू शकत नाही. हा राजकीय विषय नाही. राजकीय विषयावर आरोप-प्रत्यारोप ठीक आहेत. हा कौटुंबिक विषय आहे. एखाद्यावर वैयक्तिक टीका केल्यास त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे राजकीय नेत्यांनी एकमेकांवर असले आरोप करू नयेत. या प्रकरणावर राज्य सरकार अडचणीत येईल, असा विरोधकांचा भ्रम आहे”, अशीही प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “शेतकऱ्यांनी सुप्रिम कोर्टात जाऊन कोणतीही मागणी केली नाही. त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे. न्यायपालिका कायदे बनवत नाही. न्यायालयाने बनवलेली समिती प्रो कायद्यांची आहे. केंद्राने कायदे मागे घेतले तर काही काळ सरकार पडेल असं होणार नाही. मोठे बहुमत आहे. या समितीकडून शेतकऱ्यांनी न्याय मिळेल असं वाटत नाही. शेतकऱ्यांनी माघार घेतली तर सरकारची प्रतिमा तळपून निघेल”, असेही मत राऊत यांनी स्पष्ट केले.