पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. बुधवारी झालेल्या सर्व साधारण सभेत पाटील यांच्या कार्यपद्धतीला लक्ष्य केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच शहरातील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे आयुक्तांच्या मदतीला धावून आले. आयुक्त चांगले काम करीत असून त्यांच्या या चांगल्या कामावर ठपका ठेवून पालिकेतील सत्ताधारी भाजप आपले चुकीचे काम लपवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
अमोल कोल्हे हे कालच्या पालिका सभेला पूर्णवेळ म्हणजे तास उपस्थित होते. त्याविषयी बोलताना आमदार बनसोडे म्हणाले, हा पक्षादेश आहे. आपले शिलेदार आणि सत्ताधारी कसे काम करतात. चुकीचा विषय बहुमताने रेटून मंजूर करायचा व आर्थिक जुळणी न झालेले विषय दाबून ठेवायचे ही सत्ताधारी पक्षाची पद्धत आहे. सत्ताधाऱ्यांची ही लपवाछपवी या भेटीमुळे काल समोर आली. पुढील काळात असाच वॉच ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी दुसरे कोणीतरी पदाधिकारी या महासभेला येतील, असे त्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटीच्या कामात भ्रष्टाचार झाला असून त्याकडे आयुक्त पाटील यांचे लक्ष नाही. तसेच त्यात सामील असलेल्या अधिकाऱ्यांवर त्यांनी कारवाई केली नाही. म्हणून ते सुद्धा त्यात सहभागी असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी कालच्या महासभेत केला. तर, त्यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी टीका केली होती. मात्र, गेल्या साडेचार वर्षात वेगळ्या तऱ्हेने पाटील यांचे काम झाले आहे, असे सांगत त्यांच्यापूर्वीचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे नाव न घेता कोल्हे यांनी त्यांना लक्ष्य केले. तसेच पाटील यांचे कालच अभिनंदनही केले होते. त्यानंतर आज बनसोडे यांनी आयुक्त पाटील चांगले काम करीत असून त्यांच्यावर हा खापर फोडण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. शासन त्यांच्यामागे खंबीर उभे असून त्यांनी कोणतीही तमा न बाळगता शहरातील जनतेच्या हिताची कामे करावीत, असेही त्यांनी आयुक्तांना आश्वस्त केले.
असमाधानी लोक ओरड करणारच, असा टोला त्यांनी लगावला. चुकीची कामे होऊ द्यायची नाहीत असा आयुक्तांनी घेतलेला पवित्रा योग्य आहे. त्यांच्या कामाचे आम्ही समर्थन करतो. या चांगल्या कामाचे निश्चित कौतुक करू, असेही ते म्हणाले. चांगल्या कामाचे कौतूक करणे ही आमची पद्धत आहे. पण, मागील काळात कोणतेच चांगले काम झालेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे कौतूक करण्याचा प्रश्नच नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. शहरवासियांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.