मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी एकांतवासात जात असल्याची पोस्ट फेसबुकवर केली होती. या पोस्टनंतर राजकीय चर्चेला उधाण आले होते. मात्र, अखेर डॉ. अमोल कोल्हे समोर आले. मागील बऱ्याच काळापासून सोशल मीडियात सुरु असलेल्या चर्चेवर अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिलं. मानसिक थकवा येणं, सतत धावपळीतून याकडे पाहणं गरजेचं होतं. मानसिक थकव्याची जाणीव झाल्यानं मी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, मी या काळात प्राणायाम केले. मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत मानसिक आरोग्य जपण्यासाठी काही उपाय केले जातात.मानसिक आजारासाठी काऊन्सिलिंगची गरज भासते. लोकांमध्ये मानसिक तणाव याबद्दल जनजागृती व्हायला हवी. माझ्या पोस्टकडे खूप निगेटिव्ह दृष्टीकोनातून पाहिले गेले याचे नवल वाटते असे ते म्हणाले.
अमोल कोल्हे पुढे म्हणाले, मी कुठलाही फेरविचार करत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून दिलेली आश्वासनं, संकल्पना याबाबतही फेरविचार करणं गरजेचे आहे. पुढच्या काही काळात अनेक उलगडा होत जाईल. एकांतवासात गेल्यानंतर ज्या बातम्या आल्या. ज्या प्रतिक्रिया आल्या. मानसिक आरोग्याची गरज आहे का? तर हे असू शकतं. मला राजकारणाचा कंटाळा आला असता तर माझ्या संकल्पना, योजना इतक्या उत्साहाने मांडल्या नसल्या, असं ते म्हणाले.