मुंबई: महाविकास आघाडी सरकारचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे. मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत, असा आरोप 9 नोव्हेंबर 2021 रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मलिकांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केलीय. या जमिनी मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींच्या आहेत. मलिकांचे सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांच्या जवळचा सलीम पटेलसोबत व्यावसायिक संबंध आहेत. या दोघांनी मलिकांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीला मुंबईतील एलबीएस रोडवरची कोट्यवधींची जमीन कवडीमोल किमतीने विकलीय, असा आरोप फडणवीस यांनी केला होता. या व्यवहाराचे दाऊद इब्राहिमचा ईडी कस्टडीतील भाऊ इकबाल कासकरकडून पुरावे मिळालाचा दावा करत, त्यांना ईडीने अटक केली आहे.
नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत आज विरोधी पक्ष भाजपने विधिमंडळाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. मलिकांना राजीनामा द्यायला लावा. त्यांना आता पदावर राहण्याचा कसलाही नैतिक अधिकार नाही, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मलिकांच्या राजीनाम्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही भाजप आक्रमक झालेला पाहायला मिळाला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच नवाब मलिक यांचा राजीनामा येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला. दाऊदचा दलाल असणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्या अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आक्रमक झाली आहे. नवाब मलिकांमुळे महाराष्ट्रातील तरुण बेरोजगारांची फसवणूक झाली आहे. येथे भाजप किंवा मनसेचा प्रश्न नाही, तर तरुण बेरोजगार झाले आहेत. आम्ही विरोधी पक्षात आहोत, तर आवाज उठवणार असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.