नागालँड : एकीकडे देशात विरोधी पक्षांचे ऐक्य व्हावं यासाठी सातत्याने शरद पवार पुढाकार घेत आहेत. तर दुसरीकडे नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
नागालँडमध्ये एनडीपी आणि भाजपा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या दोन्ही पक्षानं नागालँडमध्ये सरकार स्थापन केलं आहे. निफियू रिओ हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळाल्या आहेत. सात जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेत जाण्याचा आग्रह धरला. यावर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. आज सकाळी नागालँडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी शरद पवारांनी भेट घेतली. या भेटीत स्थानिक नेत्यांच्या मागणीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीने नागालँड सरकराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
एनडीपीपीनं २५ तर भाजपनं १२ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ७ , एनपीपीनं ५ आणि नागा पीपल्स फ्रंट, लोजप(रामविलास) आणि आरपीआय (आठवले) प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. त्याबरोबरच जेडीयूनं एक जागा जिंकली आहे, तर चार अपक्षांनीही विजय मिळवला आहे.