पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयातील दूरध्वनीवर एका व्यक्तीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली) असे फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी दुपारी चाकणकर यांच्या धायरी येथील कार्यालयातील दूरध्वनीवर जयंत रामचंद्र पाटील या व्यक्तीने फोन करून ‘रूपाली चाकणकर कुठे आहे, मला तिचा मोबाईल नंबर हवा आहे. ती काय करते पाहून घेतो. तिचे धायरी येथील कार्यालय पेटवून देतो’, अशी धमकी दिली. चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी सदर प्रकार चाकणकर यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर त्यांनी याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या पूर्वी मनसेच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनाही पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान फोनवरून धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनाही धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.