पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा सह पाच जणांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. यानंतर विरोधी पक्ष राष्ट्रवादी आक्रमक झाला आहे. आज (बुधवारी) राष्ट्रवादीने स्थायी समिती बरखास्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. यावेळी चक्क हातगाडीवर 100, 200, 500, 2000 हजार रुपयांच्या नोटांचे (नकली) बंडल ठेवून, ‘खाऊ गल्ली’ असे गाड्याला नाव देऊन हटके आंदोलन केले.
”गली गली मे शोर है, भाजपवाले चोर है”, ”चोर है, चोर है भाजपवाले चौर है”, ”भाजप वाल्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, ”आमच्या नळाला पाणी नाही”, ”आमच्या परिसरातील संडास सफा सफाई होत नाही, पैसे घ्या पण धुऊन द्या”, ”भगाओ, भगाओ चोर भगाव”, ”पकडला पकडला चोर पकडला”, ”जेलात होता चोर होता है”, ” भ्रष्टाचारी भाजपचा धिक्कार असो”, ”चोरांचा पक्ष बीजेपी पक्ष’, ”नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी”, ”बीजेपी हमे डरती है पोलीस को आगे करती है”, अशा जोरदार घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने देत महापालिकेवर मोर्चा काढला.
हातगाड्यावर टोपली ठेवली होती. त्यात नकली पैसे ठेवले होते. त्यावर खाऊ गल्ली असा उल्लेख होता. ‘धरा दाम पण करा काम’ करा अशा घोषणा दिल्या जात होत्या. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, समीर मासूळकर, राजू बनसोडे, नगरसेविका पोर्णिमा सोनवणे, निकिता कदम, संगीता ताम्हाणे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, अतुल शितोळे, काळूराम पवार, जगन्नाथ साबळे, प्रवक्ते फझल शेख, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमित लांडगे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.