श्रीक्षेत्र देहूगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; शिवसेना हद्दपार तर भाजपचा एकच विजयी

0

पुणे : मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत २०१९ साली झालेल्या युवा नेते पार्थ पवार यांच्या पराभवाचा पहिला वचपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार सुनील शेळके यांनी काढला. श्रीक्षेत्र देहूगाव नगरपंचायत निवडणुकीतून शिवसेना हद्दपार झाली, तर भाजपाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे हा निकाल आगामी लोकसभा निवडणुकीतील पार्थ पवारांच्या विजयाची नांदी मानला जात आहे.

तीर्थक्षेत्र देहूगाव नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. राष्ट्रवादीचे १४, अपक्ष २ आणि भाजपचे 1 उमेदवार विजयी झाले आहेत. पहिल्या नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली. शिवसेना, काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्यानंतर देहूगाव नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक झाली. दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. त्याची मतमोजणी आज पार पडली. राज्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती.

मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची जादू चालली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 उमेदवार विजयी झाले. तर, दोन अपक्षांनीही बाजी मारली. भाजपचा एक उमेदवार विजयी झाला आहे. राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता आली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन मातब्बर उमेदवाराचा पराभव झाला. दरम्यान, आमदार सुनील शेळके यांनी निवडून आलेल्या सर्व राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या पारड्यात मतदान केल्याबद्दल मतदारांचेही आभार मानले आहेत.

निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :
राष्ट्रवादी : १४
प्रभाग क्रमांक १ मध्ये मीना कुराडे, प्रभाग क्रमांक २ मध्ये रसिका काळोखे, प्रभाग क्रमांक ३ मध्ये पूजा दिवटे, प्रभाग क्रमांक ४ मयूर शिवशरण, प्रभाग क्रमांक ६ मध्ये पुनम काळोखे, प्रभाग क्रमांक ९ मध्ये स्मिता चव्हाण, प्रभाग क्रमांक १० मध्ये सुधीर काळोखे, प्रभाग क्रमांक ११ मध्ये पोर्णिमा परदेशी, प्रभाग क्रमांक १२ मध्ये सपना मोरे, प्रभाग क्रमांक १३ मध्ये प्रियंका मोरे, प्रभाग क्रमांक १४ मध्ये प्रवीण काळोखे, प्रभाग क्रमांक १५ मध्ये आदित्य टिळेकर, प्रभाग क्रमांक १६ मध्ये योगेश परंडवाल, प्रभाग क्रमांक १७ मध्ये ज्योती गोविंद टिळेकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत.

दोन अपक्ष, एक भाजप :
प्रभाग क्रमांक ७ मध्ये योगेश काळोखे व प्रभाग क्रमांक ५ मध्ये शितल हगवणे हे दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपच्या पूजा काळोखे निवडून आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.