पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वृक्षगणना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी पुढकार घेतला आहे. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, अशी भूमिका पार्थ यांनी घेतली आहे. त्यामुळे शहरातील वृक्षगणना सुरू होवून पर्यावरण रक्षणाला हातभार लागेल, अशी अपेक्षा निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२२ मध्ये होत आहे. त्यापार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी शहरात लक्ष घातले असून, सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर बोट ठेवले आहे.
शहरातील वृक्षगणनेची मुदत संपूनही ठेकेदार काम पूर्ण करीत नाही. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी प्रशासन बोटचेपी भूमिका घेत आहे. वृक्षगणनेचे सदर काम २०१८ साली मेसर्स टेरेकॉन इकोटेक प्रा. लि. या संस्थेला देण्यात आले होते. दोन वर्षे या कामाची मुदत होती. ती संपल्यानंतरही वृक्षगणनेचे काम पूर्ण झालेले नाही. याविरोधात रयत विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. तसेच, महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि संबंधित कार्यकर्त्यांमध्ये वादही झाला आहे.
दरम्यान, शहरातील पर्यावरण प्रेमी काही तरुणांनी सदर बाब युवा नेते पार्थ पवार यांच्या कानावर घातली आहे. पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जातो. शहरातील नागरिकांना चांगली जीवनशैली असलेले वातावरण निर्माण करण्यासाठी मानव आणि वृक्ष याचे प्रमाण समतोल असले पाहिजे. त्यासाठी वृक्षगणना करणे गरजेचे आहे. यासंदर्भात संबंधित अधिकारी आणि प्रशासनाशी चर्चा करुन वृक्षगणना करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे पार्थ पवार यांनी म्हटले आहे.
स्मार्ट सिटीतील कामांवर ‘वॉच’
पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. या योजनेंतर्गत नवी सांगवी, काटे पुरम चौक आदींसह विविध भागांमध्ये विकासकामे सुरू आहेत. मात्र, पिंपळे गुरव भागात कामाचा दर्जा निकृष्ट आहे. शहरातील अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे सर्वसमान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सामान्य नागरिकांनी आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या फोटोंसह थेट पाठवाव्यात, असे आवाहन युवा नेते पार्थ पवार यांनी केले आहे.