पिंपरी : सुदुंबरे येथील NDRF च्या पाचव्या कॉर्प्स कॅम्पसचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज (दि.19) उद्घाटन करण्यात आले. शहा यांनी नवीन कॅम्पसची पाहणी करत माहिती घेतली. यावेळी त्यांनी NDRF जवानांसोबत स्नेह भोजनही केले.
जवानांशी संवाद साधणे, त्यांच्या देशसेवेच्या विलक्षण भावनेच्या जवळ जाणे आणि त्यांच्यासोबत आनंददायी वेळ घालवणे हे मनाला खूप आनंद आणि अभिमान देते. अशी प्रतिक्रिया अमित शहा यांनी यावेळी दिली. अमित शहा म्हणाले, ‘मोदी सरकार एनडीआरएफ’ला अधिक कार्यक्षम करण्यासह उत्तम संसाधन उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. एसडीआरएफ’ला एनडीआरएफच्या बरोबरीचे बनवण्याची वेळ आली आहे. एवढ्या मोठ्या देशात आपत्तीच्या वेळी जनतेला वाचवण्यासाठी NDRF आणि SDRF यांच्या एकत्रित प्रशिक्षणावर आणि सरावावर आपण भर दिला पाहिजे.’
‘लोकांचे प्राण वाचवण्यासाठी एनडीआरएफ जवानांची तत्परता आणि समर्पण यामुळे लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. एनडीआरएफने आपल्या कर्तव्यदक्षतेने देशातच नव्हे तर परदेशातही जो विश्वास कमावला आहे, त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.
सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी इतर देशांत जाऊन देखील लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ते काम करतात. ही परंपरा आपल्याला पुढे चालू ठेवायची आहे.’ असे अमित शहा म्हणाले.