पिंपरी : वाकड परिसरात कोरोना प्रतिबंध लसीकरण केंद्रात वाढ करण्याची गरज आहे. तसेच लसीकरण प्रक्रियेत होणारा राजकीय हस्तक्षेप थांबवावा अशा मागणीचे निवेदन युवा नेते राम वाकडकर यांनी पालिका आयुक्त व महापौर यांच्याकडे दिले आहे.
यावेळी विद्युत वितरण समितीच्या सदस्या भारतीताई विनोदे उपस्थित होत्या. राम वाकडकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक २५ (वाकड ) मध्ये सध्या फक्त दोन लसीकरण केंद्र सुरु आहेत. जवळच असलेल्या हिंजवडी आय टी पार्क येथे काम करणारे बहुसंख्य नागरिक या भागात वास्तव्यास आहेत.
सध्या लसीकरण झाल्याशिवाय कोणतीही कंपनी कामगारांना कामावर रुजू होण्याची परवानगी देत नाही त्यामुळे सदर केंद्रांवर प्रचंड गर्दी होत आहे. त्यातच भर म्हणून येथील लोकप्रतिनिधी टोकन वाटप व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करून आपल्या जवळच्या लोकांचे लसीकरण करून घेत आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना टोकन उपलब्धच होत नाहीत.
आपण या विषयात लक्ष घालून या भागातील गुड्स सेमेरीटन स्कूल, वाकड व शिष्य पूर्व प्राथमिक विद्यालय,वाकड या दोन ठिकाणी नवीन लसीकरण केंद्र सुरु करून देण्यास सहाय्य करावे अशी मागणी वाकडकर यांनी केली आहे.