पिंपरी (रोहित आठवले) : इंग्रजांच्या काळात आणि नैसर्गिक उजेड कमी असल्याने सुरू झालेली अमावास्येच्या रात्रीची विशेष नाकाबंदी ही परंपरा आज १०० वर्षांनंतरही कायम आहे.
मुंबईत अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना नाईट राऊंड सुरू करत असताना राज्यातील ही अंधश्रध्देच्या जवळ जाणारी परंपरा मोडीत निघणार का हा सवाल आहे. महाराष्ट्रात आणि अन्य काही राज्यात ठराविक जाती जमातींकडून अमावस्येला दरोडा, लुटमार, बलात्कार करून खून केल्यावर तेथे पूजा घालत त्या घरात मिळेल ते खाऊन निघायचे अशी परंपरा असल्याची नोंद पोलिस दफ्तरी आढळते.
महाराष्ट्राची प्रतिमा पुरोगामी राज्य म्हणून आहे. या पुरोगामी नावाखाली अनेकांनी राजकारणही केले आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर झाला. मात्र, हा कायदा अंमलात आणणाऱ्या पोलिसांपर्यंत अद्याप तो पोहचलेलाच नसल्याचे विशेष नाकाबंदी आदेशावरून दिसून येते. राज्यात सर्वत्र दर अमावस्येला रात्रीची ही विशेष मोहीम राबविली जात असते. चोऱ्यामाऱ्या करणाऱ्यांची अंधश्रद्धा मोडीत काढण्यासाठी ही नाकाबंदी असल्याचे पोलिस सांगतात.
परंतु इंग्रजांच्या काळात ज्या जाती जमातींमुळे ही परंपरा सुरू झाली त्याच जातीतील अनेक मुले आज पोलिस दलात, सैन्य दलात, विविध पदांवर चांगले काम करीत आहेत. पण याचा विसर खात्याला पडल्याचे दिसते. तर जातीपातींच्या पलीकडे असलेली गुन्हेगारी मोडीत काढण्याची जात गरज आज महाराष्ट्राला आहे. दररोजची सक्षम नाकाबंदी अपेक्षित आहे.
शहर जिल्ह्यांच्या सीमा आजच्या रात्री नाकाबंदी करून तपासल्या जात असतात. पेट्रोलपंप, सराफी बाजार, निर्जनस्थळ, बँका, लॉज-हॉटेल-ढाबे, मुख्य बाजारपेठ, विरळ लोकवस्ती आणि सर्व सोसायट्यांच्या आसपास तपासणी केली जाते. झोपडपट्टी आणि गुन्हेगारांची आश्रयस्थानं येथे जाऊन कोणी सापडते का हे पहिले जाते. हवे असणारे, फरार झालेले, मिळून न येणारे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आरोपी आजच्या रात्री शोधले जातात.
वास्तवात दररोज प्रत्येक पोलिस चौकी, पोलिस ठाणे तसेच सहायक आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांचे कार्यक्षेत्र असलेल्या भागात नाईट राऊंड म्हणून प्रत्येक भागात एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जात असते. तरीही, रात्रीच्या घरफोड्या, वाहन चोरी, कामगारांना लुटणे हे प्रकार सर्रास घडत असतात.
नाईट राऊंड झोपा काढण्यासाठी असतात असा समज ही पोलिस दलात काही अंशी आजही कायम आहे. “मी मागच्याच आठवड्यात नाईट राऊंड (रात्रगस्त) केला आहे; परत आज का करायचा” असेही प्रश्न दर आठवड्याला विचारणारे अधिकारी राज्यात सर्वत्र आहेत. पण रात्र गस्त काय असते हे पूर्वीच्या अधिकाऱ्यांच्या कामावरून दिसून यायचे.
पुणे शहरात (तेव्हा पिंपरी चिंचवड स्वतंत्र आयुक्तालय नव्हते) तत्कालीन सहपोलीस आयुक्त संजय सिंघल हे होते. खडकी भागात त्यांनी रात्र गस्त साठी नियुक्त असणाऱ्या एका हवलदराचीच तपासणी केली असता, त्याच्याकडील बंदुकीतील गोळ्या तो पोलिस ठाण्यात विसरून आल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे सिंघल यांनी सर्वांना घाम फोडला होता. तर त्यानंतर संबंधित सर्वच अधिकाऱ्यांना झोपेतही नाईट राऊंड ची स्वप्न पडत असल्याची मिश्किल टिप्पणी केली जायची.
चोरांचा अंधश्रद्धेवर असलेला विश्वास मोडून काढण्यासाठी असो वा कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी असो एकच दिवस सर्वत्र नाकाबंदी करण्यापेक्षा, ही कामगिरी दररोज पोलिसांकडून झाल्यास नागरिकांचे दागिने, पैसे, वाहने लुटमारी पासून वाचतील.
नाईट राऊंड मध्ये अनेक गुन्ह्यांची उकल झाल्याची उदाहरणेही आहेत. नाईट राऊंड (रात्र गस्त) चे वेगळे असे महत्व देखील आहे. पण अमावस्येला सर्व गुन्हेशाखा व पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी रस्त्यावर उतरवून खरच गुन्हे रोखले गेले का हा देखील संशोधनाचा विषय होऊ शकेल.
सध्या राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारकडून पुरोगामित्वाचा तुलनेने अधिक पुरस्कार केला जातो. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील तसेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेले सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अंधश्रध्देच्या जवळ जाणारी ही परंपरा नेमकी काय आहे? नाईट राऊंड चे अर्थकारण काय आहे? ही परंपरा मोडीत काढताना नागरिकांच्या फायद्याची अधिक सक्षम रात्रगस्त कशी होऊ शकेल याचा अभ्यास करण्याची गरज आहे.