पुणे : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. त्यानंतर काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुण्यातील चित्रपट आणि नाट्यगृहात सध्याच्या निर्बंधांनुसार 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश मिळणार आहे..तर खुल्या जागेतील कार्यक्रमांसाठी 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी असणार आहे. या निर्बंधांचा 2 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला फटका बसण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे नवे आदेश सोमवारी काढले आहेत. पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारच्या आढावा बैठकीमध्ये मनोरंजन क्षेत्राला दिलासा दिला होता. पण ही बैठक होताच काही वेळातच राज्य शासनाने नवे आदेश जाहीर केले आहेत. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळं संपूर्ण जग धास्तावलं आहे. याच पार्श्वभूमीवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी रात्री नव्याने आदेश जारी केले. चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय, सभागृह यासह इतर बंदीस्त जागेतील कोणत्याही कार्यक्रमासाठी जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नव्यानं लावण्यात आलेल्या निर्बंधांचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला याचा फटका बसणार आहे. येत्या 2 डिसेंबरपासून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात होत आहे. याबरोबरच खुल्या जागेतील कार्यक्रमासाठी 1 हजार पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहाणार असतील तर त्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास द्यावी लागणार असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. याबरोबरच संपूर्ण खुल्या जागेत कोणताही समारंभ, संमेलनाला तेथील जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांच्या उपस्थितीतची परवानगी देण्यात आली आहे.