नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. नागरिकांना लसीकरण सुरू झाल्याचा दिलासा मिळत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिखर गाठलं आहे आणि सर्वाधिक धोका महाराष्ट्रातच आहे. लॉकडाउन लागणार का, नवीन निर्बंध काय असतील याबाबत स्पष्ट आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी प्लॅन केंद्रीय गृहमंत्रालयाने मांडला आहे आणि त्याबाबत राज्यांना कळवण्यात आलं आहे.
मोदी सरकारने कोरोनाच्या नव्या निर्बंधांविषयी संकेत दिले आहेत. 1 एप्रिलपासून नवे निर्बंध लागू होतील आणि 31 एप्रिलपर्यंत ते असतील, असं या सूचनेमध्ये म्हटलं आहे.
गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात कोरोनाव्हायरचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुढचा प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाय योजण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात यावेत, असं म्हटलं आहे. याचा अर्थ आता स्थानिक, जिल्हा, तालुका पातळीवर लॉकडाउन करण्याचा निर्णय राज्यांना देण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रात काही ठिकाणी कोरोनाचा उद्रेक दिसून येतो आहे. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती शहरांमध्ये कोरोनाची उच्चांकी संख्या नोंदली गेल्याने गरज पडल्यास लॉकडाउनचा पर्याय विचारात घेऊ असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. आता केंद्रानेही त्याला हिरवा कंदिल दाखवला आहे. स्थानिक पातळीवर कोरोनारुग्णांची संख्या लक्षात घेत कंटेन्मेंट झोन ते लॉकडाउनचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे.
गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहतूक बंद होती. आता मात्र कुठल्याही परिस्थितीत प्रवासाचे निर्बंध नसतील, असं केंद्राने जाहीर केलं आहे. जिल्हाबंदी नसेल, राज्या राज्यांमधली प्रवासी वाहतूकही सुरू राहील, हे स्पष्ट करण्यात आलं आहे.
कोणत्याही व्यवहारांवर बंदी घालण्यात येणार नाही, पण निर्बंध असतील. SOP चे पालन करून व्यवहार सुरू ठेवू शकतील, असं सांगण्यात आलं आहे.
गेल्या वर्षीचा एप्रिल आणि मे महिना किराणा दुकानाच्या बाहेर आखलेले गोल, त्यामध्ये अंतर ठेवून लाग लागलेल्या लांबच लांब रांगा, एका गावातून दुसऱ्या गावात जायचे बंद झालेले मार्ग, रस्त्यांवरचा शुकशुकाट आणि स्मशानशांतता हे अजूनही स्मरणातून गेलेलं नसतानाच पुन्हा एकदा कोरोना विषाणूचं संकट गहिरं झालं आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने या विषाणूशी प्रभावी लढण्यासाठी तीन स्टेप्सचा अॅक्शन प्लॅन दिला आहे. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट अर्थात अधिकाधिक चाचण्या, कोविड पॉझिटिव्ह पेशंट असेल तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आणि उपचार या त्रिसूत्रींच्या साहाय्याने कोरोनावर मात करा, असं या प्लॅनमध्ये सांगण्यात आलं आहे.