पिंपरी : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू केलेल्या संचारबंदीच्या आदेशात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सुधारणा केली आहे. त्यात काही आस्थापनानांना सवलत दिली आहे.
अत्यावश्यक सेवेशी संबंधित उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. या कंपन्यांना आवश्यक मालाचा पुरवठा करणारे दुकाने केवळ त्याच कारणासाठी सुरू ठेवता येतील. किरकोळ विक्री करता येणार नाही.
दर 15 दिवसाला कोरोना चाचणी करण्यातून यांना सवलत दिली आहे.
इ-कॉमर्स मार्फत घरपोच सुविधा देणारे कर्मचारी, हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांचे कर्मचारी, खासगी वाहतूक करणारे वाहनचालक, मालक, दैनंदिन वर्तमान पत्रांचे छपाई व वितरण करणारे कर्मचारी, घरगुती काम करणारे कामगार, स्वयंपाकी, जेष्ठ नागरिक आणि घरी आजारी असलेल्या नागरिकांना सेवा देणाऱ्या नर्स यांना चाचणीतून सवलत देण्यात आली आहे. पण, लसीकरण करणे बंधनकारक आहे.
मेस मधील पार्सल सेवा सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मद्यविक्रीची होम डिलिव्हरी सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत करता येणार आहे. तसेच चष्माची दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू ठेवता येणार आहे.