मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा एक मोठा घोटाळा पत्रकार परिषद घेऊन उघड करणार असं टि्वट त्यांनी काही दिवसापूर्वी केलं होत. आज त्यांनी पुन्हा टि्वट करीत खळबळ उडवून दिली आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कंबोज यांच्या यापूर्वीच्या टि्वटला उत्तर दिले आहे. पवारांच्या या उत्तरानंतर आता पुन्हा एकदा मोहित कंबोज यांनी आज (सोमवारी) टि्वट करीत रोहित पवारांवरच अप्रत्यक्षपणे प्रतिहल्ला केला आहे.
राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच जेलमध्ये जाणार असं टि्वट काही दिवसापूर्वी कंबोज केलं होतं. आता कंबोज यांच्या रडारवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार असल्याचे दिसते. रोहित पवार यांच्याबद्दल अभ्यास करत असल्याचा इशाराच कंबोज यांनी टि्वटमधून दिला आहे.रोहित पवारांबाबत त्यांनी सूचक टि्वट केलं आहे.
“बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीची केस स्टडी सध्या मी अभ्यास करत आहे. त्या केस स्टडी संदर्भातली संपूर्ण माहिती मी लवकरच बाहेर घेऊन येणार आहे,” असा इशाराच कंबोज यांनी दिला आहे. रोहित पवार यांच्या ॲग्री आणि सहकारी कारखान्यांबाबतचा अभ्यास सुरू केल्याचे कंबोज यांनी स्पष्ट केलं आहे.
रोहित पवार शेगाव येथे संत गजानन महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी कंबोज यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “मोहित कंबोज यांच्या टि्वटला फारसे महत्त्व देण्याचं काम नाही, मोहित कंबोज यांनी स्वतः ओव्हरसिज बँकेतील 52 कोटी बुडवून जनतेला चुना लावला होता, आता त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असा पलटवार रोहित पवार यांनी केला.