नवी दिल्ली : चीनसह जगातील विविध देशांत कोरोनाचे संकट झपाट्याने वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात कोरोना वाढणार की नाही, यासाठी पुढचे चाळीस दिवस महत्वपूर्ण ठरणार असल्याचे आरोग्य खात्यातील सूत्रांकडून बुधवारी येथे सांगण्यात आले. जानेवारीच्या मध्यापासून देशात कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
चीन, जपान, द. कोरियासह जगातील इतर काही देशांमध्ये कोरोना झपाट्याने वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यादृष्टीने अलिकडेच सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये माॅक ड्रील घेण्यात आले होते. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रुग्णालयांनी आवश्यक त्या उपकरणांची जमवाजमव करणे तसेच मनुष्यबळाची तयारी ठेवणे गरजेचे असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले होते.
आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झालेला असला तरी सध्या भारतातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सरकारी आकडेवारीनुसार मागील चोवीस तासात कोरोना रुग्णसंख्येत १८८ ने वाढ झाली होती. आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या वाढून ४ कोटी ४६ लाख ७७ हजार ६४७ वर गेली आहे तर सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ४६८ इतकी झाली आहे. कोरोनाने आतापर्यंत ५ लाख ३० हजार ६९६ लोकांचा बळी घेतलेला आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत सकि्रय रुग्णांचे प्रमाण 0.01 टक्के इतके आहे तर रिकव्हरी दर 98.80 टक्के इतका आहे.