NIA चे महाराष्ट्रासह ८ राज्यांत ७६ ठिकाणी छापे

0

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर तसेच ड्रग तस्करांच्या नेटवर्क विरोधात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने देशभारतील वेगवेगळ्या राज्यातील तब्बल 76 ठिकाणी छापे टाकत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया आणि गोल्डी ब्रार यांच्यासाठी काम करणाऱ्या 6 आरोपींना अटक केली आहे.

एनआयए याप्रकरणी पुढील कारवाई करत आहे.

NIA ने अटक केलेल्या आरोपींमध्ये लकी खोखर, लखवीर सिंग, हरप्रीत, दलीप बिश्नोई, सुरिंदर आणि हरी ओम यांचा समावेश आहे. एनआयएने मंगळवारी 8 राज्यांतील 76 ठिकाणी छापे टाकले. या कारवाई अंतर्गत पंजाब, हरियाणा, दिल्ली, यूपी, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात कारवाई करण्यात आली आहे.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तीन एफआयआर नोंदवल्यानंतर एनआयएने टाकलेला पाचवा छापा होता. या कालावधीत, एजन्सीने मोठ्या प्रमाणात डिजिटल उपकरणे, काडतुसे, नऊ पिस्तूल आणि रायफल तसेच 2.3 कोटी रोकड जप्त केली आहे. तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर्सची चौकशी आणि यापूर्वी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे एनआयएने छापे टाकण्याचा निर्णय घेतला होता.

एनआयएने मंगळवारी गुंडांना शस्त्रे पुरवणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या हवाला ऑपरेटर्सना लक्ष्य केले. पंजाबमध्ये मुक्तसर येथील लखबीर सिंग, अबोहरचा नरेश यांच्यासह अनेक कबड्डी खेळाडूंना देखील लक्ष्य करण्यात आले.

एनआयएच्या म्हणण्यानुसार, हे लोक आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नागपाल अंबिया आणि महाराष्ट्रस्थित बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येच्या कटात सामील होते. गेल्या वर्षी पंजाबमध्ये या दोघांची हत्या झाली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या दोघांच्या हत्येचा कट तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर्सनी रचला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.