पुणे : एटीएम कार्ड क्लोन करून त्याद्वारे बँक खात्यातील 1 लाख 10 हजार रूपयांची रक्कम काढून घेणार्या नायजेरियन आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली.
बशीर उर्फ लुकास विल्यम उर्फ ओमईके गॉडसन (वय 31 जगताप डेअरी, रहाटणी) आणि इनाम गॅब्रिअल चुकेव्हबुका (शारदा कॉलनी, पिंपळे निलख, दोघे मुळ नायझेरिया) असे अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पांडुरंग कंद (वय 40, रा. लोणीकंद ता.हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. नाशिक फाटा कासारवाडी येथील एटीएम सेंटरमध्ये 25 ते 28 एप्रिल या दरम्यान हा प्रकार घडला.
आरोपींनी एटीएममशीनमध्ये छेडछाड करून कार्ड क्लोनिंगचे यंत्र लावले. त्याद्वारे फिर्यादी यांचे कार्डची माहिती मिळविली तसेच क्लोन (बनावट कार्ड) तयार करून त्याव्दारे एटीएम सेंटरमधून फिर्यादींच्या खात्यातील 1 लाख 10 हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले तसेच त्यांच्याकडून कार्ड क्लोनिंगसाठी वापरण्यात येणारे कार्ड रीडर मशीन, वेगवेगळ्या बँकांचे 10 एटीएम कार्ड, लाल आणि काळ्या रंगाने चिकटटेप जप्त केले आहेत.
दुसर्याच्या नावे असलेले सीमकार्डचा वापर आरोपी इनाम चुकेव्हबुका याच्याकडे सापडलेल्या आयफोन मधील मोबाईल क्रमांक हा लुकास विल्यमस या नावाने रजिस्टर असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच यातील आरोपी चुकेव्हबुका याला यापूर्वी 2020 मध्ये सायबर गुन्ह्यांत अटक केली होती. त्यानंतर जामीनावर बाहेर पडल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हा केला असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले आहे
आरोपींनी अशाप्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता :
अटक केलेल्या आरोपींकडे असलेले विविध बँकाचे एटीएम कार्ड त्यांनी कोठून आणले? जप्त केलेल्या एटीएम कार्डमधील कोणत्या खातेधारकाचा डेटा आरोपींनी क्लोन केला आहे? तसेच आणखी किती लोकांची फसवणूक केली?, फिर्यादींच्या खात्यावरून काढलेली रक्कम जप्त करणे,अशाप्रकारे पुण्यासह भारतातील इतर भागातही गुन्हे केल्याची केले असल्याची शक्यता असून त्या संदर्भात तपास करण्यासाठी अटक दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली. न्यायालयाने आरोपींना पाच मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.